डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 6, 2025 8:56 PM | HMPV | Karnataka

printer

देशात HMPV संसर्गाच्या ३ रुग्णांची नोंद, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा

देशातल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरस एचएमपीव्हीच्या एकूण रुग्णांची संख्या ३ झाली आहे. बेंगळुरूमध्ये ३ महिन्यांची मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलामधे तर अहमदाबादमध्ये २ वर्षाच्या मुलात एचएमपीव्हीचा संसर्ग आढळला आहे. अहमदाबाद इथं मुलाला सर्दी-खोकल्याची लक्षणं तर बेंगळुरूतल्या दोघांनाही ब्रॉन्कोन्यूमोनियाचा त्रास होता. तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

 

एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणं विशेषत: चीन, मलेशिया आणि विविध देशांमध्ये आढळत आहेत. देशात इन्फ्लूएंझासदृश आजार किंवा गंभीर श्वसन आजारात वाढ झालेली नाही. देशात श्वसनाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं तसचं परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

 

मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनांचे निवेदन प्रसिध्द केलं आहे.

 

राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही.

 

एचएमपीव्ही हा नवा विषाणू नसून भारतातल्या फ्लू विषाणूचा भाग आहे त्यामुळे बहुसंख्य भारतीय लोकांमध्ये याविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं. यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे. सामान्यत: एचएमपीव्हीच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, सर्दी आणि श्वास लागणे समाविष्ट आहे. जो श्वसनमार्गाच्या वरील भागात संसर्गास कारणीभूत ठरतो तसचं हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. एचएमपीव्ही विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस् मध्ये २००१ मध्ये आढळला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा