डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.

 

राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

 

पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

 

पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

 

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा जिल्ह्यातल्या कण्हेर आणि उरमोडी धरणातून आज सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातही अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा