रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळली होती. आज संध्याकाळ पर्यंत दरड हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे.
परभणी जिल्ह्यात ही विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. परभणी,नांदेड,हिंगोली,बीड या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट तर ठाणे आणि पालघरमध्ये उद्यापर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी येत्या शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.