डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात राष्ट्रीय अपत्ती दलाच्या पथकाला यश आलं.

 

नाशिक जिल्ह्यासह शहरात काल सकाळपासून पाऊस सुरु होता. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत. कुडाळ नजीक पावशी इथं महामार्गावर पाणी आल्याने गेल्या १२ तासांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या पूरपातळीवरून वाहत आहेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तीन नद्या इशारा पातळीच्या वरून, तर एक नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. परिणामी जिल्ह्यातले नदी, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक बंधाऱ्यांवरुन पाणी वाहत आहे. काल दुपारी पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं. जिल्ह्यातल्या अनेक भागात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा