डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.

 

रायगड जिल्ह्यात सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळ भिसे खिंडीत दरड कोसळली आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यात भातलावण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दुर्गम भागातली गावं सोडून चिखलणी शेतीच्या अनेक कामांसाठी पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे.

 

विदर्भात अनेक ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात आज सकाळी पाणी साचलं. तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कुही परिसरात काही रस्ते बंद केले गेले.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा- महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून ढगफुटी सदृश पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातल्या २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. जिल्ह्यातल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत तर तेलंगणा राज्यातल्या मेडिगड्डा बॅरेजमधून १० हजार ५७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणातून ५ हजार क्यूसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्यानं नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातले अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. नागभीड तालुक्यातली दोन मुलं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. त्यापैकी एका मुलाचा मृतदेह खोल पाण्यात सापडला. दुसऱ्याचा शोध अद्याप चालू आहे.

 

अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे अचलपूर, चांदूरबाजार इथल्या अनेक गावांमध्ये तसंच बडनेरा शहरात पाणी साचलं. चांदूरबाजार तालुक्यातल्या देऊरवाडा इथं मेघा नदीला पूर आला आहे. मेळघाटातले अनेक नदीनाले दुथडी भरून वाहत असल्यानं काही गावांचा संपर्क तुटला आहे.

 

अकोला जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळं पिकं कोमजली होती. मात्र गेले दोन दिवस पाऊस पडल्यानं पिकांना नव संजीवनी मिळाली आहे.

 

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात गेल्या चार दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. यात दोंडाईचा शहर तसंच शिंदखेडा तालुक्यातल्या चिलाने आणि पंचक्रोशी परिसरातल्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं. यामुळे स्थानिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीची खासदार शोभा बच्छाव यांनी काल पाहणी केली.

 

गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे भामरागडजवळच्या पर्लकोटा नदीला पूर आला. तिथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्लीसह सत्तावीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली तालुक्यातल्या पोटेगाव जवळच्या कुंभी नाल्याच्या काठावर अडकलेल्या काही शेतकऱ्यांना मदत पथकानं बोटीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं.

 

गोंदिया जिल्ह्यात शेतात काम करत असताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलं आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. रिमझिम पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. तसंच सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ, यांसारखी पिकं जोमाने वाढलेली दिसून येत आहेत.

 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजेच ३६ फुटांवर असून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे. पुराचं पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असं इशारा प्रशासनानं दिला आहे

 

सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९पूर्णांक८ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा