डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे. 

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुटुंब बाधित होऊन ३६६ जणांचं स्थलांतर करण्यात आलं.  माणगाव इथं नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. कुडाळ तालुक्यात पुरामुळे १५८ गावांतल्या ३३२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचं नुकसान झालं असून पंचनाम्याचं काम सुरु आहे.

गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत आज संध्याकाळी  जोरदार पाऊस पडला. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

अकोल्यातही आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

बीड जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे आष्टी तालुक्यात कडी नदीवर बांधलेला  तात्पुरता  पूल  नदीच्या पाण्यात वाहून गेला.  त्यामुळे अहमदनगर – बीड मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणात ३ पूर्णांक ९७ शतांश टीएमसी पाणीसाठा असून धरणातून तेराशे घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात पंचगंगा नदीवरचे ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

सांगली जिल्ह्यातही काल सर्वत्र पाऊस पडला. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस शिराळा तालुक्यात झाला. जिल्ह्यातल्या वारणा धरणात सध्या १६ पूर्णांक ६६ शतांश टीएमसी पाणीसाठा असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा