गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळं भात पिकाला मोठा लाभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यात काल बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. पवनी तालुक्यातील कोंडा इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यानं संपूर्ण बाजार जलमय झाला होता. तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यंदाच्या हंगामातील पहिलाच पाऊस असल्यानं शेतकरी सुखावला आहे.
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.बीड जिल्ह्यात पावसाचा जोर काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र तरीही जिल्ह्यातल्या १४३ प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून, काही प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेलेली आहे. माजलगाव प्रकल्पातही सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.