तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, आणि दक्षिण कर्नाटकात तसंच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत उद्या अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभांगानं वर्तवला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत तो हळूहळू उत्तरेकडे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
तर,महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुण्यात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरु लागलं आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
तर सांगली जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, कोयना आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं आणि पाटबंधारे विभागानं केलं आहे. कोल्हापुरात काल रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळं राधानगरी धरणाचे सातही दरवाजे पुन्हा उघडले आहेत. तुळशी धरणातूनही विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.