मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९० टक्के भरलं असून, धरणात १३ हजार ६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या धरणाचं जलपूजन केलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या काठावरील नागरिकांनी सद्य:स्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. काल अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी शिंदे यांचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथं पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या दगावल्या, तर शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या नुकसानीचा तत्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस काल पुराच्या पाण्यात वाहून गेली.
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं, तर कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. चार गावातून ३९ जणांना एनडीआरएफ च्या जवानांच्या मदतीने पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर काल सकाळी वीज कोसळली, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
नांदेड जिल्ह्यात ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतीचं दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. उंचाडा इथं कयाधु नदीच्या परीसरात अडकलेल्या २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पावसामुळे २५ जनावरं दगावली असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधल्या संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्यानं, हा मार्ग काल वाहतुकीसाठी बंद केला होता. नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं, महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत.
धाराशिव जिल्ह्यात १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले बहुतांश नदी, नाले, ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत आहे. यामुळे तेर मुरुड आणि धाराशिवहून लातूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.