देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी आज अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामानशास्त्रविभागाने कळवलं आहे. नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, आणि सिक्किम इथं आज जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, आणि उत्तरप्रदेशचा पूर्व भाग इथं हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. पंजाब, हरयाणा, चंडीगढ, आणि दिल्लीत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंड मधे उद्या आणि परवा तर अरुणाचल प्रदेशात येत्या बुधवार गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातल्या काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरु असून सिमला आणि सिरमौर जिल्ह्यांमधील काही भागांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागात पर्यटकांनी जाऊ नये अशा सूचना हवामान विभागानं पर्यटकांना आणि नागरिकांना दिल्या आहेत. येत्या १० ऑगस्टपर्यंत सिमलामध्ये मैदानी आणि मध्य पहाडी भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच लाहौल-स्पिती जिल्ह्यातल्या म्याड खोऱ्यात ढगफुटीमुळं टिंगरथ आणि करपट नाल्यांना आलेल्या पूरामुळं एक पूल वाहून गेल्यानं खोऱ्यातल्या अनेक गावांबरोबर संपर्क तुटला आहे.
राजस्थानात काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळं अजमेर, जैसलमेर, टोंक, बारमेर, पाली , बालोत्रा आणि बूंदीसह १३ जिल्ह्यांधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच या विभागांमध्ये हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून जैसलमेर मध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्याबरोबरच बालोत्रा, अजमेर सारख्या जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोधपूरमध्ये बोरानाडा परिसरात पहाटेच्या सुमारास कारखान्याची भिंत कोसळल्यामुळं १३ मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी झाला. काल रात्री जोधपूर इथल्या गोतावर धरणात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे.
गेले चार दिवस मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं दहा मोठ्या धरणांमधून पाणी सोडण्यात आलं असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भोपाळमधील मोठा तलाव बरगी, बाणसागर सारखी धरणं भरली आहेत. तर इंदूर, ग्वाल्हेर,चंबळ, उज्जैन,भोपाळ अशा १३ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा २२ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला आहे. तसंच पू्र्वेकडील जबलपूर, रीवा शहडोल आणि सागर विभागात सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर मंडला जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.