डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 2, 2024 7:18 PM | Heavy rain

printer

आंध्रप्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती

देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे.  अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं असून ,सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान झालं आहे.  परभणी – जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सेलू इथं पूरस्थिती निर्माण झाली असून उपआयुक्तांनी लष्कराला मदतीसाठी पाचारण केलं आहे. ६० सैनिक आणि वैद्यकीय पथकं बचावकार्य करीत आहेत.

आंध्र प्रदेशात राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली. विजयवाड्यात मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची 6 पथकं, 40 बोटी आणि 6 हेलिकॉप्टर्स पाठवली जातील असं शहा यांनी नायडू यांना सांगितलं. दरम्यान पूरस्थितीमुळं राज्यातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली आहे.

तेलंगणमध्ये खम्माम, महबूबाबाद आणि सूर्यापेट जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यांमधल्या शेकडो गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. हजारो नागरिक टेकड्यांवर, घरांच्या छतांवर आणि महामार्गांवर अडकून पडले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी राज्यात एनडीआरएफ ची 9 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुरात रेल्वेमार्गांचा काही भाग वाहून गेला असून काझीपेट विजयवाडा भागात पाच रेल्वेगाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. तर तेलंगणला इतर राज्यांशी जोडणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा