डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. धेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा अंधेरी सब वे, तसंच दादरच्या हिंदमाता भागात पाणी साचलं होतं. मुंबई आणि उपनगरांत गेल्या ४८ तासांपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

 

नवी मुंबईत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी वाशी नेरूळ, सानपाडा परिसरात साचलेलं पाणी आता ओसरलं असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बेलापूर इथं डोंगरावर अडकलेल्या ६० हून अधिक पर्यटकांना, नेरूळ एमआयडीसी इथं अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून महाडमध्ये सावित्री आणि रोह्यात कुंडलिकेच्या पाण्यानं धोक्याची पातळी गाठली आहे. आंबा, गाढी, पाताळगंगा आणि जिल्ह्यातील अन्य नद्यांना पूर आले आहेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुपारी दोनच्या सुमाराला, खेड तालुक्यात जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली. लांज्यातली काजळी नदी धोका पातळीच्या जवळ आहे. राजापुरातली कोदवली आणि लांज्यातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत.

 

यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्यातला कोसारा सोईट मार्ग बंद झाला आहे. वर्धा नदीला पूर आल्यामुळे कोसारा सोईट पुलावरून तीन फूट उंच पाणी वाहत आहे. वणी तालुक्यातले शेलु – खुर्द आणि शिवनी- चिंचोली हे रस्तेही बंद आहेत. जिल्ह्यात 24 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून यात १७ घरांचं अंशतः नुकसान झालं. सरासरी पर्जन्यमान ४३ टक्के एवढे झाले असून अनेक भागात शेती पाण्याखाली गेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ३१ राज्य महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली शहरात आज १९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भागात पाणी साचलं आहे. भामरागडजवळच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरु लागला असून गोसेखुर्द धरणातल्या पाण्याचा विसर्गही कमी होत आहे. पूरग्रस्त भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. देसाईगंज तालुक्यात कोंढाळा इथं तलावात मासे पकडायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढच्या २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला असून ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा