मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सात जिल्ह्यातल्या २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात ७३ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यातल्या तुर्काबाद, चिकलठाण्यासह जालना, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याकाळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.