कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरु आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या नद्यांवरचे ७४ बंधारे पाण्याखाली गेले असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातल्या तीन मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सिरोंचा इथल्या शासकीय वसतिगृहात पाणी शिरल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागानं विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. हवामान विभागानं जिल्ह्याला पुढले २४ तास रेड अलर्ट जारी केला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून १ हजार १११ क्युमेक्स, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या चिचडोह बॅरेजमधून ५ हजार ४२६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भंडारा इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर ३ महिला जखमी झाल्या.