डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागांत पावसानं जोर धरला आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली.  शहरातले रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी दिसून आली, मात्र सर्व उपनगरी रेल्वे मार्गांवरची सेवा सुरळीत सुरु आहे. 

 

रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसानं पुन्हा जोर धरला असून, आजही तो कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे. खेड मधली जगबुडी आणि लांज्यातली काजळी या नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या तेरेखोल, गड, कर्ली, वाघोटन या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तेरेखोल नदी धोक्याच्या पातळी वरून वाहत असून प्रशासनानं नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

 

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात अती मुसळधार पावसामुळे  शेतातल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

 

भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. धरणाचे १९ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले असून, त्यामधून ७८ हजार १९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी पात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातून  जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मसुलकशा घाटात पुलाचं बांधकाम सुरु आहे. त्यासाठी   तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग आज जोरदार पावसात वाहून गेल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा