राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या येलदरी, दुधना, ढालेगाव तारुगव्हाण आणि मासोळी या धरणांच्या पाणी साठ्यात चांगली भर पडली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे गोदावरी , पूर्णा, दुधना, करपरा या नद्यांना पूर आला आहे. झिरोफाटा – पूर्णा, पूर्णा-पालम या मार्गांवर पुराचं पाणी पुलावर आल्यामुळे आजही वाहतूक बंद आहे. जिंतूर तालुक्यात करपरा नदीला पूर आला असून, सेलु तालुक्यातल्या बोथ, ब्रम्हवाकडी, रोहिना काजळे, रावा या गावांचा आज सकाळ पर्यंत संपर्क तुटला होता.
जालना जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस पडत असून, जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीला पूर आला असून जिल्ह्यातले सर्वच प्रकल्प जवळजवळ शंभर टक्के भरले आहेत.
खडकपूर्णा धरणाचे सर्व १९ दरवाजे उघडले असून, जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.