डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. मध्य-महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरदेखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणत: ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. संततधार पावसानं नदी-नाल्यांना पूर आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेनं होण्याची शक्यता आहे.

 

सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून आज रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांना अतिपावसाचा तडाखा बसला असून शेकडो हेक्टर शेतजमिनींमध्ये पावसाचं पाणी शिरलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, यवतमाळ पुसद उपविभागातल्या मुसळधार पावसानं सर्वत्र पाणी साचल्यानं यवतमाळच्या पुसद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे.

 

नांदेड जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.

 

वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे खंडाळा घाट इथं दरड कोसळल्यानं सकाळपासून वाशिम – पुसद मार्ग बंद असून वाहतूकव्यवस्था खोळंबली आहे.

 

कालपासून हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसानं जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच कयाधू नदी पात्र सोडून पाणी अनेक शिवारांमध्ये घुसलं आहे

सर्वाधिक वाचले

सर्व पहा