डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार, कोकणात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या बहुतांश भागात कालही पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी आणि विन्हेरे या स्थानकांदरम्यान काल दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणार्‍या तेजस एक्सप्रेस,जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरी स्थानकात सायंकाळी पावणेसहापासून थांबवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

चिपळूणमध्ये एनडीआरएफची एक तुकडी सज्ज असून,खेडमध्ये येण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी काल संध्याकाळी पुण्यातून रवाना झाली.जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेडमधल्या अनेकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. चिपळूणची वाशिष्ठी नदी,राजापुरातली कोदवली आणि लांज्यातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत.मंडणगड तालुक्यातल्या भारजा नदीला पूर आला असून, चिंचघर-मांदिवली पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे, अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा खेड तालुक्याला बसला असून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून काही ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे.

 

रायगड जिल्ह्यात आज महाड,माणगाव,पोलादपूर तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कालही कायम होता. अंजनेरी इथं सहलीला गेलेली मुले जोरदार पावसामुळे अडकली होती.वनखात्याने त्यांची सुखरूप सुटका केली.पुणे शहर आणि जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला.या पावसाने खडकवासला धरण साखळीतील पाणी साठयात वाढ झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा