भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनानं शाळा-महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे. वैनगंगा नदीला पूर आला असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन आठ किलोमिटर पर्यंत पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोसीखुर्द धरणाचे २७ गेट दीड मीटर तर ६ गेट एक मीटर उघडण्यात आले आहेत. त्यामुळं नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी प्रकल्प तसंच नाथसागर जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरीकाठच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त गेवराई आणि माजलगांव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.