मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सिता न्हाणी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वहातूक कोंडी झाली होती.
बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नांदेडमधला विष्णुपुरी प्रकल्प ९८ टक्के भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात येत्या पाच सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता परभणीच्या वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे.