डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय – प्रधानमंत्री

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरयाणातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कसलीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयाचं श्रेय समर्पण भावनेनं अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

जम्मू-कश्मीरमधून ३७० वं कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झालं, आणि तिथल्या जनतेनं लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या तिथल्या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असं त्यांनी म्हटलय. नॅशनल कॉन्फरन्सची या निवडणुकीतली कामगिरी कौतुकास्पद असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

 

भाजपाला कौल दिल्याबद्दल भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरयाणातल्या जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नकारात्मक आणि विभाजनवादी राजकारणाला जनतेनं पूर्णपणे नाकारलं असल्याची टीका त्यांनी केली. जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली असल्याचं सांगत पक्षाच्या तिथल्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. 

 

हरयाणातल्या जनतेनं काँग्रेसला नाकारलं असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या जनतेला दिसत असल्याचा संदेश मतदारांनी दिला आहे, असं ते म्हणाले. 

 

हरयाणामधे जातीयवादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर हरयाणाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. हरियाणात जे घडलं तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा