हज यात्रा अधिक सुखकर आणि सुलभ व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यात्रेकरूंच्या सोईसाठी डिजिटल पायाभूत सेवा सुरू केल्यानं अधिक जणांना त्याचा लाभ मिळत आहे. विशेषतः अधिकाधिक महिला यात्रेकरूंना स्वतंत्रपणे यात्रा करणं शक्य झाल्यानं महिला समानतेला चालना मिळत आहे. याशिवाय अल्प उत्पन्न गटातल्या यात्रेकरूंसाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी हजला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय यात्रेकरूंचा कोटा एक लाख ७५ हजार इतका असून याविषयी जानेवारी महिन्यात एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यापैकी एक लाख ४० हजार यात्रेकरू भारतीय हज समितीकडे नोंदणी करून यात्रा करणार आहेत.