बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प ही पर्यावरण संवर्धनासाठी काळाची गरज असून शेतकरी उत्पादक संघटनांशी बांबू बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील असं राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष गुरदीप सिंग यांनी म्हटलं आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी धोरण ठरवण्याकरता बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते.
महामंडळाच्या सोलापूरमधल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पात कोळशामध्ये मिसळण्यासाठी महामंडळ शेतकऱ्यांकडून बांबू बायोमास खरेदी करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एकूण इंधनाच्या केवळ दहा टक्के बांबू बायोमास वापरला जाईल. बायोमासची उपलब्धता जशी वाढेल तस हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
या बैठकीला महाराष्ट्र परिवर्तन संस्था अर्थात मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल आणि महामंडळाचे सोलापूर प्रकल्प प्रमुख तपनकुमार बंदोपाध्याय उपस्थित होते.
महामंडळाने 50 वर्ष बांबू खरेदी कराराचे आश्वासन दिल्याने बांबू विक्रीचा प्रश्न आता सुटला आहे, अशा शब्दात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.