डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 30, 2025 3:13 PM | GudiPadwa 2025

printer

गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह

वर्षप्रतिपदा, अर्थात गुढी पाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारुन, तिची पूजा करुन तसंच रांगोळ्या, झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि गूळाचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोनं,  चांदी, इत्यादी मौल्यवान  वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. 

 

गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या विविध मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे. आज विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध वयोगटांतले स्त्री-पुरुष पारंपरिक पोषाखांमध्ये शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबईत गिरगाव इथं नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. 

 

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय केरळकर यांनी पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली. गुढीपाडव्यानिमित्त आमदार संजय केळकर यांनी मासुंदा तलावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन केलं. डोंबिवलीमधेही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून मोठ्या संख्येनं नागरिक स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. 

 

रत्नागिरीत आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. वेगवेगळे संदेश देणारे विविध चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

 

गोंदियात महिला संघटनांनी एकत्र येत सामूहिक गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत केलं. 

 

अकोल्यात संस्कृती संवर्धन समिती’च्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त आज पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेतल्या स्त्री-पुरुषांनी मोटर-सायकल रॅली काढली.  

 

श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी परंपरेप्रमाणे पहाटे मंदिराच्या शिखरावर गुढी उभारून पाडवा साजरा करण्यात आला. 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवादा शहरात गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवादा इथल्या गांधी इंटर स्कूलच्या मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष स्वागताचे  चैत्र शुक्लादी, युगादी, चैती चांद, नवरेह, चेराओबा हे सणही आज देशाच्या विविध भागात साजरे होत आहेत. 

 

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. 

 

विकासाची महागुढी उभारू या, असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य, पशुधनाची समृध्दी आणि भरभराट तसंच निसर्गाची कृपा घेऊन येवो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा