राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, युगादी, चैती चांद, नवरेह, चेराओबा या सणांनिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
नवीन वर्षाची सुरुवात करणारे हे सण नवता, समृद्धी आणि आशा यांचं प्रतीक असून सर्वांना निसर्गाशी जोडतात असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
नव्या संवत्सराचा हा सण सर्वांच्या जीवनात नवीन उत्साह आणेल आणि विकसित भारताच्या संकल्पाला ऊर्जा मिळेल, अशी आशा प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
विकासाची महागुढी उभारू या, असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य, पशुधनाची समृध्दी आणि भरभराट तसंच निसर्गाची कृपा घेऊन येवो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.