नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी, स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेताजींनी लाखो लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा त्यांचा अथक लढा आणि आझाद हिंद फौजेचं त्यांचं साहसी नेतृत्व येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील असं राष्ट्रपती म्हणाल्या.
नेताजींचं समर्पण आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. तर नेताजी सुभाषचंंद्र बोस यांचं स्वातंत्रलढ्यातील योगदान अतुलनीय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रधानमंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयानं नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं तीन दिवसांचा उत्सव आयोजित केला आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या वचनबद्धतेबद्दल ओळखले जातात, असं प्रधानमंत्री म्हणाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली.
मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला फुलं वाहून अभिवादन केलं.