आज पोलीस स्मृतिदिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथे चिनी सैन्याचा हल्ला परतवताना दहा पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतींना नायगाव पोलीस मुख्यालयातल्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतले वाणिज्यदूत आणि प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलानेही समाज माध्यमावरच्या संदेशातून शहीद पोलिसांना अभिवादन केलं आहे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे.