वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे जुनागढ जिल्ह्यात सासण – गीर इथं राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या सातवी बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. नदीतल्या डॉल्फिन विषयीचं पहिलं वहिलं सर्वेक्षण त्यांनी प्रकाशित केलं. देशातल्या २८ नद्यांच्या परिसंस्थांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार केला आहे. आतापर्यंत ६ हजार ३२७ डॉल्फिन आढळले असल्याचं त्यात म्हटलं आहे. डॉल्फिन संवर्धना विषयी स्थानिक रहिवाशांमधे जागृती निर्माण करावी, असं मोदी यांनी सांगितलं.
देशातल्या सिंहगणनेची १६वी फेरी यंदा घेण्यात येईल असं सांगत त्यांनी बार्डा अभयारण्यात सिंहांच्या जतनासाठी मदत जाहीर केली. याखेरीज देशात अन्यत्र चित्ते आणण्याचा, नदीकाठच्या परिसरात व्याघ्र जतन आणि मगरींचं जतन करण्याची योजना असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. माळढोक पक्षी आणि अस्वलाच्या प्रजातींचं जतन करण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्याचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. वन्यजीवन संरक्षणात इको- पर्यटन आणि वन्यजीवन पर्यटनाची भूमिका महत्त्वाची आहे. वन्यजीवनातले संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने जलद प्रतिसाद पथकांना आधुनिक तंत्रज्ञान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. या विषयाच्या संशोधन आणि अभ्यासाकरता तमिळनाडूत कोईमतूर इथं उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली.