देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात आहे. मुलींचे अधिकार, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं दरवर्षी २४ जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. “उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणं” ही यावर्षीच्या बालिका दिनाची संकल्पना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्त, मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची दशकपूर्ती नुकतीच झाल्यानं राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून आज देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या, बाल विवाह आणि लिंग भेदभाव यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर उपाय शोधण्याला आणि मुलींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं जात आहे.