तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या काळात, सरकारनं पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. यांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं अनेक उपक्रमांसह महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा भक्कम पाया सरकारनं घातला आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 90 लाखांहून अधिक बचत गटांमध्ये सुमारे 10 कोटी महिला एकत्रित आल्या आहेत. तसंच 11 लाख लखपती दीदींना पंतप्रधानांकडून प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात नारी शक्तीला लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना घराची मालकी आणि सन्मान मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार आहेत. सरकारनं 4 लाख 30 हजार बचत गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला, याचा लाभ 48 लाख महिलांना झाला. बचत गटांमधील 26 लाख महिलांना मदत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची बँक कर्जे देण्यात आली.तसंच महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.