आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जमुई इथल्या जाहीरसभेला ते संबोधित करत होते. धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समाजासाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा गौरव उपवन सुरू करण्याची घोषणा केली. तसंच, त्यांनी यावेळी जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम-जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या ११ हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी केला. तसंच, त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. यासोबत त्यांनी दोन आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयं तसंच दोन आदिवासी संशोधन संस्थांचंही उद्घाटन केलं.