कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी १ लाख ३२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची तरतूद केली असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एप्रिल २०२१ पासून एक लाख तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते बांधले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना केलं. आपल्या मंत्रालयानं आतापर्यंत १८ ओटीटी मंचांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी डिजिटल पायरसीवरच्या चर्चेदरम्यान दिली.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत देशभरात ३० जूनपर्यंत ३४ कोटीपेक्षा जास्त आयुष्मान कार्डांचं वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.