देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. सभागृहात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणी संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजार कोटींपर्यंत गेला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले. रेल्वेच्या परिचालनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.