जपान आणि भारत एकमेकांचे स्वाभाविक भागीदार असून दोन्ही देशांचे संबंध आज सर्वोच्च पातळीवर असल्याचं जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी म्हटलं आहे. मुंबईत राजभवनात आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जपानचे महाराष्ट्राशी विशेष चांगले संबंध असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कौशल्य प्रशिक्षणासाठी जपान सहकार्य करीत आहे असंही त्यांनी सांगितलं.
जपानमधले मशरूम आणि आंब्यांचा दर्जा अतिशय चांगला असून महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांना तशा प्रकारच्या उत्पादनात जपानने मदत करावी , तसंच दोन्ही देशातल्या कृषी विद्यापीठांमध्ये सहकार्य स्थापित व्हावं अशी अपेक्षा यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली.