राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या ‘नादस्वर उत्सव’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या कलेचं जतन करण्याच्या हेतूनं दरवर्षी ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.