आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला.
आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवतं. त्यांचा लाभ आदिवासींमधल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यादृष्टीनं त्यांना ओळख दर्शविणारी कागदपत्रं वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचं रुपांतर आदर्श गावांमध्ये करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, वरिष्ठ सरकारी अधिकारी, आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.