विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करणं याला सरकारचं प्राधान्य असून, विमान वाहतूक सर्वदूर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात नागरी विमान वाहतुकीकरिता मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी टिकाऊपणा हा दृष्टिकोन केंद्रस्थानी असणे आवश्यक असून, कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आणि विमान वाहतूक क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी हरित तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचीही गरज त्यांनी अधोरेखित केली.
दुसरी आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद यावर्षी 11 आणि 12 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं होणार आहे. या परिषदेत प्रमुख विमान वाहतूक कंपन्या, संघटना, उद्योजक, तज्ज्ञ नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत.