ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांदरम्यान भारतीय क्रीडापटूंसाठी कांदिवलीचं साई क्रीडा संकुल एक महत्त्वाचं क्रीडा केंद्र बनेल, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल केलं.
उत्तर मुंबईतल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण काल गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी गोरेगाव इथल्या उद्यानाचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी मालाड इथं मालवणीभ भागात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेच्या इमारतीचं लोकार्पण आणि कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात अन्न वाटप केलं.
कांदिवली इथं क्रीडा केंद्रासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर गोयल यांनी स्वाक्षरी केली. यानंतर त्यांनी बोरिवली इथं कुलूपवाडी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं आणि दहिसरच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या.