तळागाळातल्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. नागपूर इथं एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातल्या आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणं ही सरकारची प्राथमिकता आहे, असंही जाधव म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या निर्णयाचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
नागपूर एम्स मध्ये अत्यंत कमी दरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात, इथं दररोज साडेचार हजार रुग्ण उपचार घेतात अशी माहिती एम्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी यांनी दिली. या कार्यक्रमात एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर विकास महात्मे, खासदार अजित गोपचडे आणि श्यामकुमार बर्वे यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं.