राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने महायुतीच्या घटक पक्षांमधे आजपासून वाटाघाटी पुन्हा सुरु होतील. भाजपा विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. उद्या रात्री या दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा आमदारांची बैठक होणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या ४ डिसेंबरला होणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमावर संदेश लिहून स्पष्ट केलं आहे. यापूर्वी आपल्याला केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव मिळाला होता मात्र आपण तो नाकारला. आपण यापुढं पक्ष संघटना आणि लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणार असून राज्यातल्या कोणत्याही मंत्रिपदात आपल्याला रस नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यविधानसभेत भाजपाचे १३२, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ५७ तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत.