केंद्र सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ काल नवी दिल्ली इथं झाला. बालविवाहाच्या रूढीचं निर्मूलन करणं, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. अभियानासाठी १३० जिल्ह्यांची निवड झाली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना सांगितलं.
बालविवाह हा केवळ गुन्हाच नव्हे तर मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं सांगून मंत्री म्हणाल्या की, बाल विवाह मुक्त भारत मोहीम हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून एक निरंतर चळवळ आहे. अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाहमुक्त भारत पोर्टलचं अनावरणही केलं. बालविवाह रोखणं आणि बालविवाहाच्या घटनांची प्रभावीपणे नोंद करणं याद्वारे मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी हे ऑनलाइन व्यासपीठ विकसित केलं आहे.