जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. तसंच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
देश का प्रकृति परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा २५ डिसेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा तसंच आयुर्वेदिक महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्य माया राम उनियाल, वैद्य ताराचंद शर्मा, वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.