देशातले सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचा परिवार यांची एकूण संख्या सव्वा कोटी इतकी असून त्यांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करता येऊ शकतो, असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज केलं. पुण्यात नवव्या सशस्त्र माजी सैनिक दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी वीरपत्नी आणि वीरमातांचा सन्मान द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच, सन्मान या नियतकालिकाचं प्रकाशनही करण्यात आलं.
देशात २४ लाख माजी सैनिक, ७ लाख वीरपत्नी तसंच, लष्करी सेवेत कार्यरत असलेले १२ लाख सैनिक आहेत. हा संपूर्ण परिवार देशासाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनेंतर्गत १ हजार २०० लाभार्थींना ५८ कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आल्याची माहिती द्विवेदी यांनी दिली. तसंच, २८ हजार माजी सैनिकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या संदर्भात २२ नवीन सामंजस्य करार करण्यात आल्याचं द्विवेदी म्हणाले.