डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2024 9:12 AM | Ganpati Visarjan

printer

राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

राज्यभरात घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचं आणि माहेरवाशिणी गौरीचं काल भावपूर्ण वातावरणात आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा आग्रह धरत विसर्जन करण्यात आलं. गणेश विसर्जनसाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. पुण्यात महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्त्रोतांमध्ये मूर्तींचं विसर्जन करु नये, असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी केलं.

कोल्हापूर जिल्ह्यातही सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम कुंड, काईली यांची व्यवस्था जिल्हा प्रशासनानं केली होती. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव, ईराणी खण, कळंबा तलाव, कोटीतिर्थ तलाव, राजाराम तलाव, राजाराम बंधारा याठिकाणी गर्दी झाली होती. सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात एक हजार 520 मूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन झालं.

पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात 7 हजार 508 गणेश मूर्तीचं विसर्जन झालं. त्यापैकी 4 हजार 981 म्हणजेच 66 टक्क्यांहून अधिक मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात झालं.

सांगलीकरांचा मानाचा सांगली संस्थानच्या श्री गणपतीची भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात काल 5510 गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. पालिका प्रशासनानं सांगली, मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसच विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज ठेवली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात नदी, तळी, ओहळांसह समुद्रावरही भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी मिरवणूकही काढण्यात आली. काल जिल्ह्यातल्या सुमारे एक लाख 15 हजार घरगुती, तर 17 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा