डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 18, 2024 3:02 PM | Ganpati Visarjan 2024

printer

राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनाने सांगता

णेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. राज्यात सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन आज सकाळपर्यंत सुरु होतं.

मुंबईत गणेशोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे उत्साहात झाली. अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातले समुद्रकिनारे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेले होते. घरगुती आणि सार्वजनिक मिळून सुमारे सदतीस हजार मूर्तींचं विसर्जन झालं.  मोठमोठ्या गणेशमूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत यंत्रांच्या सहाय्याने विसर्जित करण्यात आल्या. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन आज सकाळी ११ च्या सुमारास संपन्न झालं. अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी प्रशासनाच्या वतीने चौपाटीवर उभारण्यात आलेल्या विविध मंडपांना भेट देऊन गणरायांची आरती केली. तसंच देश विदेशातून आलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीच्या दृष्टीने वाहतुकीचं चोख नियमन करण्यात आलं होतं.

पुण्यात विसर्जन मिरवणुका अजूनही सुरु आहेत.  मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तसंच अनेक ठिकाणी मार्ग वळवण्यात आले होते. सकाळपर्यंत १७१ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसरंजन झालं होतं.

राज्यात इतरत्रही गणेशविसर्जन शांततेत आणि उत्साहात झालं. त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. 

नांदेड जिल्ह्यात २५ हजार सार्वजनिक गणेश मंडळ तसंच घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आलं.  नांदेड शहरात २६ ठिकाणी महापालिकेच्या वतीने श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.   मोठ्या गणेश मूर्तींचे  विसर्जन हे शहरानजीक झरी तलावात करण्यात आलं. तसेच पासदगाव, आसना, नावघाट इथंही कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. रात्री अकरा वाजेपर्यंत बहुतांश गणेश मंडळाच विसर्जन पार पडले होते. विसर्जन मिरवणुकात डीजे, लेझर बिमवर बंदी असल्याने मिरवणुकांमध्ये ढोल ताशांचा वापर करण्यात आला. शहरात  ठीकठिकाणी विविध संस्था, गणेश मंडळांच्या वतीने अन्नदानही करण्यात आलं.

नंदुरबार जिल्ह्यातल्या दादा गणपती आणि बाबा गणपती या मानाच्या गणपतींच्या भेटीचा सोहळा काल झाला. काल रात्री साडे बाराच्या सुमारास दादा गणपती आणि बाबा गणपती यांचे रथ जळका बाजार परिसरात आल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशातल्या भाविकांचीही उपस्थिती होती. 

सांगली जिल्ह्यातील मिरज इथं अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा असून मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक गणेश भक्त उपस्थित होते. भव्य स्वागत कमानी आणि आकर्षक गणेश मूर्ती गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत होत्या. यावेळी एक हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. यावर्षी शहरातील अनेक मंडळांनी रक्तदान, आरोग्य शिबीर तसंच अन्नदान यासारखे उपक्रम राबविले. काही गणेश मूर्ती गणेश तलावात तर काही कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्या. मिरवणुकीच्या मार्गावर राजकीय पक्षांनी गणेश मंडळांचं स्वागत केलं. मिरवणुकीमुळे मिरजेतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता.रात्री उशिरापर्यंत मिरवणूका चालू होत्या. २०० हून अधिक सार्वजनिक गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आलं.

नाशिक मधे वाकडी बारव येथे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह इतर राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या निवडणुकीत अनेक मंडळांच्या मिरवणुकीत आदिवासी कलापथकं, मर्दानी खेळ तसेच गुलालवाडीचे लेझीम पथक आकर्षण ठरले. नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता.

 दरम्यान, गोदावरी आणि उपनद्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन होऊ नये याच्यासाठी नाशिक महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक महापालिकेच्या सहा विभागात मिळून एक लाख ८१ हजार १५७ मूर्तींचे संकलन रात्री नऊ वाजेपर्यंत झालं होतं. त्यामुळे गोदावरी नदीचं प्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. याशिवाय निर्मल्याचंही संकलन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा