गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून उत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमधे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबईत प्रसिद्ध लालबागचा राजासह इतर मंडळांचे गणपती बघण्याकरता भाविकांच्या रांगा लागत आहेत. विविध क्षेत्रातले मान्यवर सेलिब्रिटी, तसंच राजकीय नेतेमंडळी विविध मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या काही गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत. त्यात वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे. दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहूब आरास साकारणाऱ्या या मंडळाने यावर्षी कन्याकुमारीच्या प्रसिध्द स्वामी विवेकानंद स्मारकाची ५२ फूट उंच हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा २ हजार ६०७ गणेश मंडळांना पोलीस खात्याने परवानगी दिली आहे मात्र गावातील एकोपा टिकून राहावा यासाठी ८०४ गावांनी एकमताने “आमचा गाव एक : आमचा गणपती एक” या तत्वावर एकच सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्यात येत असून डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिक शहरातही गणेशोत्सव मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत डीजे बरोबरच लेझर लाईट देखील वापरणार नसल्याचं पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितलं.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन आज होत आहे. हे विसर्जन शांततेत आणि सुरक्षितरीत्या पार पडावं, यासाठी ठिकठिकाणी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.
पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. विविध देशात गणेशोत्सव कशारितीने साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री ८.०५ मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये, दररोज. आजच्या बातमीपत्रात आपण जाणून घेणार आहोत श्रीलंकेमधला गणेश उत्सव.