आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी. ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. राज्यात ढोलताशांच्या गजरात गणरायाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई – पुण्यात आले आहेत. या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. पूजा साहित्य, वस्त्रालंकार, तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मुंबईत सव्वा दोन लाख घरगुती आणि सुमारे १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली. श्री गणरायाचं आगमन आनंदाचं, समृद्धीचं पर्व घेऊन येवो, अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. गणेशाची मनोभावे सेवा करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच पर्यावरणाची योग्य काळजी घेऊन सणवार साजरे केले जावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या निवासस्थानीही आज गणरायाची प्रतिष्ठापना झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं.
मुंबईच्या गणेश गल्लीतल्या गणेशोत्सव मंडळानं यंदा ९७ व्या वर्षात प्रवेश केला असून, नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत, यंदा काही महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केले आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत. मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवासाठी चोख व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलानं ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त, २ हजार ४३५ पोलीस अधिकारी, १२ हजार ४२० पोलीस अंमलदार तसंच राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, जलद प्रतिसाद पथकं, दंगल नियंत्रण पथकं असा चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार ८६७ घरगुती, आणि १२२ सार्वजनिक गणेशमूर्ती विराजमान झाल्या.
पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. त्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळांमध्ये बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालविण्यात येणार आहे, तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात ५७१ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवली असून ९ हजार ३५६ सार्वजनिक, तर २ लाख ५१ हजार ९६० घरगुती गणेशांची प्रतिष्ठापना झाली.
नागपुरात श्री गणेश मंदिर टेकडी बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी उसळली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी आज गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी या विद्येच्या देवतेचं वरदान मिळो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमरावतीमधेही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत आहे. महानगर पालिका आणि अमरावती शहर मूर्तिकार संघटना यांनी अमरावती शहरात ७० हजार मातीच्या मूर्ती भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
वाशीम जिल्ह्यातल्या २२५ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे.
अकोला जिल्ह्यात पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा कल दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथे कुंभारानं घडवलेल्या चिखलमातीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा होत आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन झालं .
बीड शहरात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
जालना शहरासह जिल्ह्यात गणेश आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेला आठ दिवसीय गणेश महोत्सव जालना शहरात उद्यापासून सुरु होत आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं सार्वजनिक मंडळांचा दांडगा उत्साह दिसून आला. शहरात चारशे ते पाचशे मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. मालेगाव तालुक्यांत २९३ मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे शंभर जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातही गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर मधील गणेश भक्तांनी महिला बचत गटांतल्या महिलांनी तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ‘लखपती दिदी’ ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्हाभरात १७५ हून अधिक ठिकाणी या गणेशमूर्तींची विक्रीकेंद्र उघडली होती.
दरम्यान, मुंबईत मुलुंडमध्ये आज पहाटे गणेश मंडळाचे कार्यकर्ते मंडपाजवळ बॅनर लावत असताना एका भरधाव BMW मोटारीनं दोन जणांना धडक दिली. या अपघातात एका कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.