गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून, छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं.
यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का, ३डिव्हिजन किमिटी मेंबर, १ उपकमांडर, तर ३ एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचं जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल, असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानंच मिळू शकतो, माओवादी विचारसरणीनं नाही, हे जनतेला आता पटलं आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा प्रारंभ केला, तसंच लॉईडच्या विविध उपक्रमांचा प्रारंभही त्यांनी केला. यातून ६ हजार २०० कोटी रूपयांची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसंच ताडगुडा पुलाचं त्यांनी लोकार्पण केलं. पेनगुंडा इथं फडनवीस यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचा प्रारंभही मुख्यमंत्र्यांनी केला.