जी ट्वेंटी समुहाला आपलं नेतृत्वाचं स्थान टिकवायचं असेल तर या समुहाच्या कामात जगासमोरच्या आव्हानांचं नेमकं प्रतिबिंब उमटलं पाहिजे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी समुहाच्या २०२५ सालातल्या ध्येय उद्दिष्टांशी संबंधित परिषदेत, परराष्ट्र मंत्र्यांच्या सत्रात निवेदन केलं. आंतरराष्ट्रीय आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी, आपत्कालीन प्रतिसाद, परिस्थिती पूर्वपदावर आणणे आणि पुनर्बांधणीशी संबंधीत धोरणांना भारताचा पाठिंबा असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांमधला विकास आणि सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखण्यावर चर्चा केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं.