राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज राजूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मधुकर पिचड अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभा मतदार संघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या पिचड यांनी आपल्या कारकिर्दीत आदिवासी विकास मंत्री, दुग्धव्यवसाय विकास मंत्री, पर्यटन विकास मंत्री तसंच भटके आणि इतर मागासवर्गिय कल्याण मंत्री म्हणून काम केलं होतं.
पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा, कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. पिचड यांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणारं राजकारण, समाजकारण क्षेत्रातलं मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
Site Admin | December 7, 2024 10:16 AM | निधन | मधुकर पिचड